पाटणा - जनता दलाचे १६ खासदार निवडून आल्याने जदयुकडून केंद्रात एकापेक्षा जास्त मंत्रीपद मिळावे अशी मागणी होती. परंतु, भाजपकडून फक्त एकच मंत्रीपद मिळाल्याने नाराज झालेल्या नितीश कुमारांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज (शुक्रवार) या निर्णयावर नितीश कुमार माध्यमांशी बोलताना म्हणाले, केंद्रात संख्याबळानुसार पक्षांना प्रतिनिधित्व मिळायला हवे, आम्हाल फक्त नावालाच मंत्रीपद नको.
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार म्हणाले, आम्हाला नवीन मंत्रीमंडळात फक्त नावासाठी सामिल व्हायचे नाही. मंत्रीपद संख्याबळानुसार द्यायला हवीत. परंतु, फक्त एका मंत्रीपदावर आम्ही समाधानी नाहीत. मी याबाबत पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा केल्यावर त्यांनीही हेच मत मांडले. आम्हाला किती मंत्रीपद हवी आहेत याबाबत एनडीएला अद्याप सांगितलेले नसल्याचेही नितीश कुमार म्हणाले.
आम्ही मंत्रिमंडळात सामील होणार नसलो, तरीपण आम्ही एनडीए सरकारला बाहेरुन पूर्ण समर्थन देणार आहोत. भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे त्यांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. आज सकाळी मला अमित शाह यांचा फोन आला होता. मी याआधीच भूपेंद्रजी यादव (भाजप सरचिटणीस) यांना माझा निर्णय कळवल्याचे त्यांना सांगितले. मंत्रिमंडळात नसलो तरीही आम्ही बिहारच्या विकासासाठी एकत्र राहणार आहोत, असेही नितीश कुमार म्हणाले.
नरेंद्र मोदी सरकारचा काल ३० मे रोजी राष्ट्रपती भवन येथे शपथविधी सोहळा पार पडला. बिहारमध्ये जनता दल आणि भाजप युतीने चांगली कामगिरी करताना ४० पैकी ३९ जागा जिंकल्या आहेत. १६ खासदार असूनही फक्त एकच मंत्रीपद मिळाल्याने मंत्रिमंडळात सामिल न होता नितीश कुमारांनी एनडीएला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे. तर, दुसरीकडे, लोक जनशक्ती पक्ष, शिवसेना, अकाली दल आणि आरपीआय या एनडीएच्या घटक पक्षांनी एकच मंत्रीपद मिळाले असतानाही मंत्रिमंडळात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे.