नवी दिल्ली : स्वयंघोषित फरारी धर्मगुरू नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्वतः स्थापन केलेल्या 'कैलास' या देशामध्ये येणाऱ्या व्यक्तीला मोफत व्हिसा आणि राहण्या-खाण्याची सोय करण्याची घोषणा नित्यानंदने केली आहे. बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने याबाबत माहिती दिली आहे.
तीन दिवसांचा व्हिसा..
आपल्या व्हिडिओमध्ये नित्यानंदने या योजनेबाबत माहिती दिली आहे. यावेळी तो म्हणतो, की ज्याला कोणाला कैलासमध्ये येऊन रहायचे आहे त्याने ई-मेलच्या माध्यमातून व्हिसासाठी नोंदणी करावी. मात्र, तीन दिवसांहून अधिक व्हिसाची मागणी कोणीही करू नये, असेही त्याने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियापर्यंत करावा लागणार खर्च..
काही दिवसांपूर्वीच नित्यानंदने जाहीर केले होते, की ऑस्ट्रेलियातून कैलासला जाण्यासाठी खासगी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. बुधवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये तो सांगतो, की कैलासला मोफत येणाऱ्या लोकांना ऑस्ट्रेलियापर्यंतचा खर्च स्वतःच करावा लागणार आहे. तेथून 'गरुड' ही खासगी विमानसेवा या प्रवाशांना पुढे कैलासला आणून सोडेल.
कोण आहे स्वामी नित्यानंद..?
स्वामी नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असे आहे. मूळ तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या राजशेखरनने गुजरात येथे आश्रम सुरू केला होता. याठिकाणीच मुलींचे लैंगिक शोषण, तसेच अत्याचार करून, त्याची सीडी बनवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. सध्याच्या माहितीनुसार, नित्यानंद याने गेल्यावर्षी नेपाळमार्गे भारतातून पळ काढला होता. यानंतर त्याने इक्वेडोर देशात आश्रय मिळवून तेथे स्वतःचे ‘सार्वभौम हिंदू राष्ट्र’स्थापन केले आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या देशाला त्याने 'कैलास' असे नाव दिल्याचेही समोर आले होते.
नित्यानंदाने खासगी बेटावर स्थापन केलेल्या कैलास देशाचा नेमका पत्ता माहिती नाही. मात्र, 'आपल्या देशात हिंदुत्वाचे पालन करण्याचा अधिकार बाळगणाऱ्या जगभरातील निर्वासित हिंदूंसाठी कोणत्याही सीमा नसलेले राष्ट्र' असे वर्णन या देशाच्या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. तसेच या स्वतंत्र राष्ट्रात हिंदूंना मोफत अन्न, आरोग्य व शिक्षणासह इतर अनेक सुविधा देण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून नित्यानंद याने आपल्या देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले असून देश चालविण्यासाठी निधीची मागणी केली आहे.
इंटरपोलची ब्लू नोटीस..
नित्यानंद याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय पोलीस महामंडळ, म्हणजेच 'इंटरपोल'ने यावर्षी 'ब्लू नोटीस' जारी केली आहे. 'ब्लू नोटीस' ही एखाद्या व्यक्तीबाबत जादा माहिती मिळवण्यासंदर्भात जारी करण्यात येते. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीची ओळख, पत्ता, त्याच्या हालचाली या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात येते.