नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींना शिक्षा होण्यास विलंब होत असल्यामुळे, पीडितेच्या आईने दिल्लीतील न्यायालयाबाहेरच आंदोलन केले. या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताला न्यायालयीन कारवाईसाठी सरकारने मदत करण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांनी हे आंदोलन केले.
या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने आपल्याकडे वकील नसल्याचे सांगितल्यानंतर न्यायालयाने त्याला सरकारकडून वकील देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा विधी सेवा आयोगाने पवनच्या वडिलांना वकिलांची यादी दिली आहे, त्यामधून त्यांना आपल्यासाठी वकील निवडता येणार आहे.
निर्भयाचे पालक आणि दिल्ली सरकारने दोषींच्या फाशीसाठी नवी तारीख जाहीर करावी यासाठी मंगळवारी न्यायालयात धाव घेतली होती. याआधी २२ जानेवारीला होणारी फाशी पुढे ढकलून १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर, ३१ जानेवारीला न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत ही तारीखही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने दोषींना आपापले संवैधानिक पर्याय वापरण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती. मात्र, तिहार तुरूंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकाही आरोपीने या कालावधीमध्ये कोणतीही याचिका दाखल केली नाही.
हेही वाचा : निर्भया प्रकरण : दोषींना पुढील फाशीची तारीख जाहीर करण्यास न्यायालयाचा नकार