नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीची मागणी देशभरातून जोर धरत आहे. दिल्लीच्या उपराज्यपालांनी यातील दोषी विनय शर्माची दया याचिका फेटाळल्यानंतर तसेच, हैदराबाद येथे महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर देशभरातून पुन्हा एकदा ही मागणी तीव्र झाली आहे. यानंतर तिहारमध्ये कैद असलेल्या या चारही जणांची उलटी गिनती सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे.
आशिया खंडातील सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींना लवकरच फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. देशभरात या दोषींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी वाढत असताना तिहारमध्येही यादृष्टीने हालचालींचा वेग वाढला आहेत.
तिहारमध्ये कोणी स्थायी जल्लाद नाही
तिहार तुरुंगात कोणीही स्थायी जल्लाद नाही. अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती, तेव्हा मेरठहून जल्लाद मागवण्यात आला होता. तिहार तुरुंगात फाशी देण्यात आलेला अफजल गुरू हा शेवटचा कैदी होता. अफजल गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ ला वयाच्या ४३ व्या वर्षी फाशी देण्यात आली होती. तो २००१ ला संसदेवर झालेल्या हल्ल्यात दोषी सापडला होता. यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.