नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील चौथा आरोपी असलेल्या पवन कुमार गुप्ताने आज सर्वोच्च न्यायालयात 'क्युरेटिव' याचिका दाखल केली. पवनला या प्रकरणात फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करावे, अशी मागणी त्याने या याचिकेमध्ये केली आहे.
यापूर्वी, निर्भया प्रकरणातील दोषींना तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने १७ फेब्रुवारीला ही तारीख जाहीर केली होती. त्यापूर्वी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.
हेही वाचा : दारूमुळे उत्तरप्रदेश सरकार पुन्हा अडचणीत..