नवी दिल्ली- निर्भया अत्याचारप्रकरणातला आरोपी मुकेश सिंहची याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे. निर्भयावर अत्याचार झाला त्या दिवशी आपण दिल्लीत नसल्याचा दावा मुकेशने केला होता. मात्र, हा दावा अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी फेटाळून लावला.
याचिकेत आरोपी मुकेश सिंह याला राजस्थान येथून अटक करण्यात आली होती. त्याला १७ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत आणण्यात आले असून, १६ डिसेंबर २०१२ला ज्या दिवशी निर्भयावर अत्याचार झाला त्या दिवशी तो दिल्लीत उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, अटक झाल्यानंतर तिहार तुरुंगात मुकेश याच्यावर अत्याचार करण्यात आला, असेदेखील याचिकेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, याचिकेतील हे सर्व दावे खोटे असून हे फक्त फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याच्या युक्त्या असल्याचे सरकारी वकिलाकडून सांगण्यात आले आहे.
या युक्तिवादानंतर न्यायालयाने मुकेशची याचिका फेटाळली असून आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. त्याचबरोबर, बार कौन्सिल ऑफ इंडियाने मुकेशच्या वकिलाला संवेदनशीलता पाळण्यास सांगावे, असे आदेश दिले आहे. दरम्यान, निर्भया अत्याचारप्रकरणी ५ मार्च रोजी ट्रायल कोर्टाने नवीन 'डेथ वॉरंट' काढले होते. त्यानुसार, आरोपी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार या चौघा आरोपींना २० मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता फाशी दिली जाणार आहे.
हेही वाचा- मध्यप्रदेश सत्तापेच: शिवराज सिंह चौहानांच्या याचिकेवर उद्या सुनावणी