श्रीशैलम - श्रीशैलमच्या विद्युत घरात (पॉवर स्टेशन) अचानक आग लागली. श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प नागरकुर्नूल जिल्ह्याच्या डाव्या काठावर आहे. हे भूमिगत ऊर्जा स्थानक आहे. येथे लागलेल्या आगीत 9 वीज कर्मचारी अडकले होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या नऊ जणांपैकी सात मृतदेह मिळाले असून, आणखी दोन मृतदेहांचा शोध सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या अपघातानंतर तातडीने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि अग्निशामक उपकरणांच्या माध्यमातून आग विझवण्यात आली.
घटनास्थळी हजर असलेल्या 17 जणांपैकी 8 जण बोगद्याद्वारे बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जाण्यात यशस्वी झाले. अडकलेल्यांमध्ये टीएस जेन्कोचे सहा कर्मचारी आणि तीन खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अग्निशमन दलाला घटनास्थळी तातडीने पाचारण करण्यात आले. त्यांनी उप-अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांसह अडकलेल्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, दाट धुरामुळे बचाव कार्याला अडथळा येत आहे. या घटनेनंतर वीज केंद्रातील वीज निर्मितीचे काम थांबवण्यात आले आहे. श्रीशैलम धरण कृष्णा नदीवर बांधलेले असून ते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशदरम्यानच्या सीमेवर आहे.
तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले सीआयडी चौकशीचे आदेश..
दरम्यान, या दुर्घटनेनंतर तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी याप्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.