चेन्नई - देशात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या एका संस्थेचा कट एनआयएने उधळून लावला आहे. तामिळनाडूत एनआयएने 4 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान, एक संघटना देशात दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली.
एनआयएने टाकलेल्या छाप्यात 9 मोबाइल, 15 सिमकार्ड, 7 मेमरी कार्ड, 3 लॅपटॉप, 5 हार्डडिस्क, 6 पेन ड्राइव्ह, दोन टॅब, 3 सीडी आणि डिव्हीडी जप्त केल्या आहेत. याव्यतिरिक्त काही मासिके, बॅनर्स, पोस्टर्स आणि पुस्तकेही जप्त करण्यात आली आहेत.
एनआयएने चेन्नई आणि नागपट्टिणम जिल्ह्यातील संशयित ठिकाणी शनिवारी छापे टाकले. यावेळी ही माहिती समोर आली. 9 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीनुसार संशयित दहशतवादी चेन्नई आणि नागपट्टिणम जिल्हात राहत असल्याची माहिती होती. याव्यतिरिक्त देशात अन्य ठिकाणी राहणारे लोकही या संघटनेशी निगडीत असून ते सरकारविरोधात कारवाया करण्याचा कट रचत होते. या दशतवाद्यांनी अंसारूल्ला नावाची संघटना तयार केल्याची माहिती आहे.
सय्यद मोहम्मद बुखारी, हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निधी जमवल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. एनआयएने चेन्नईमजीस सय्यद बुखारीच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला. याव्यतिरिक्त हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन याच्याही घरावर छापे टाकण्यात आले. संशयितांची सध्या चौकशी सुरू असून लवकरच या तिघांना अटकही करण्यात येऊ शकते.