विशाखापट्टणम - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी हेरगिरी प्रकरणात दहशतवादी फंडिंग करणार्या एका व्यक्तीस अटक केली आहे. नोव्हेंबरमध्ये या व्यक्तीच्या माध्यमातून नौदलाच्या 11 जवानांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयला संवेदनशील माहिती पाठविली होती.
अब्दुल रेहमान अब्दुल जब्बार शेख (वय 53) हा मुंबईचा रहिवासी आहे. अब्दुल रेहमान अब्दुल जब्बार शेखसह त्यांची पत्नी शाइस्ता कैसरही दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात सहभागी असल्याचे एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. अब्दुल रेहमान अब्दुल जब्बार शेखच्या घराच्या झडती दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अनेक डिजिटल उपकरणे व कागदपत्रे हस्तगत केली होती, असे अधिकाऱयांने सांगितले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी रॅकेटचा भंडाफोड केला होता. एनआयएने गेल्या महिन्यात मुंबई येथील रहिवासी मोहम्मद हारून हाजी अब्दुल रहमान लकडावाला याला अटक केली होती. मोहम्मद या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यात नौदलाचे 11 जवान आहेत.
भारतीय नौदल जहाजे आणि पाणबुडी आणि अन्य संरक्षण आस्थापनांच्या हालचालींविषयी संवेदनशील आणि वर्गीकृत माहिती गोळा करण्यासाठी पाकिस्तानस्थित गुप्तचर संस्थेने हेरांची भरती केली आहे.