नवी दिल्ली - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) एका मीडिया रिपोर्टच्या आधारे राजस्थान सरकारला नोटीस पाठवली आहे. राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यात अनेक कुटुंबांनी स्वतःच्या मुलांना पैशांच्या बदल्यात गहाण ठेवल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या धक्कादायक प्रकाराविषयी आयोगाने ही नोटीस बजावली आहे. याला सरकारने ६ आठवड्यांत उत्तर द्यावे, असे आयोगाने म्हटले आहे.
'राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यात अनेक गावांमधील ५०० हून अधिक कुटुंबांनी पैशांच्या बदल्यात गहाण ठेवले आहे. ही कुटुंबे 'गडेरिया समाजा'तील आहेत. केवळ १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या बदल्यात कुटुंबीयांनीच या मुलांचे असे सौदे केले आहेत,' असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. राजस्थानात बांसवाडा जिल्ह्यात लोकांची अन्नान्न दशा झाल्याचे या रिपोर्टमधून समोर येत आहे. लोक अन्नाला महाग झाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलांना गहाण ठेवण्याचा मार्ग अवलंबला आहे. संबंधित मीडिया रिपोर्टमधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
हा रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याआधारे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. 'हा प्रकार अत्यंत गंभीर असून मुलांचे बालपण कोमेजून जात आहे. तसेच, शिक्षण, विकास आदींच्या संधी नाकारल्या जाऊन लहान मुलांच्या मानवाधिकारांची पायमल्ली होत आहे,' असे यात म्हटले आहे. या रिपोर्टची सरकारने तातडीने शहानिशा करावी. तो खरा असल्यास त्याविषयी तत्काळ कारवाई करावी. तसेच, आयोगालाही ६ आठवड्यांत उत्तर द्यावे, असे या नोटीशीत म्हटले आहे.