नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात हवेचे प्रदूषण केल्याचे म्हणत राष्ट्रीय हरित लवादाने रेल्वे विभागाला 91 लाख 20 हजारांचा दंड केला आहे. ही रक्कम नुकसानभपाई म्हणून जमा करण्यास लवादाने सांगितले आहे. मालवाहू रेल्वे गाड्यांतून मालाची चढउतार करताना फैजाबाद रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेकडून प्रदूषण झाल्याचे लवादाने म्हटले आहे.
दोन महिन्यांच्या आत दंडाची रक्कम जमा करण्यास लवादाने रेल्वे विभागास सांगितले आहे. उत्तर प्रदेश प्रदूषण महामंडळाने हरित लवादात तक्रार केली होती. फैजाबाद स्थानकावर मालवाहू रेल्वेतून सिमेंट, खते, धान्य आणि इतर सामानाची चढऊतार करताना रेल्वेकडून हवा प्रदूषण होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार होत असल्याचे प्रदूषण महामंडळाने लवादास सांगितले होते. या संबंधीचा अहवाल महामंडळाने तयार केला आहे.
प्रदूषण महामंडळाच्या अहवालावर रेल्वेने योग्य ती कारवाई करावी. तसेच दोन महिन्यांच्या आत नुकसान भरपाई जमा करावी. जर रक्कम जमा करण्याच रेल्वे असमर्थ ठरली तर योग्य ती कारवाई करण्यात येईल. संबधीत रेल्वे कर्मचाऱ्यांचे पगार थांबविण्यात येतील, किंवा अधिकाऱ्यांना तुरुंगावसही होईल, असे हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. के. गोयल म्हणाले.
उत्तरप्रदेश प्रदूषण महामंडळाने फैजाबाद रेल्वे स्थानक परिसरातील हवेची गुणवत्ता तपासली. तेथील हवेत 537.53 मायक्रोग्राम पार्टीकल मॅटर एक क्युबिक मीटरमध्ये आढळून आले. हे प्रमाण इतर ठिकाणांपेक्षा जास्त आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी रेल्वेने पर्याप्त उपाययोजना केल्या नसल्याचे निरिक्षणही हरित लवादाने नोंदविले आहे.