झालावाड - कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे काहीजण काहीजण या लॉकडाऊन दरम्यानच्या आठवणी कायमस्वरुपी लक्षात राहण्यासाठी विविध फंडे वापरताना दिसतात. असेच एक उदाहरण झालावाडमध्ये पाहायला मिळाले.
झालावाडच्या रुग्णालयात काम करणाऱ्या सोहेल नावाच्या चालकाच्या घरी १५ एप्रिलला बाळाने जन्म घेतला. लॉकडाऊनमध्ये त्याचा जन्म झाल्याने या तरुणाने आपल्या बाळाचे नाव 'लॉकडाऊन' असे ठेवले आहे. जेव्हा भविष्यात कोणी आपल्या बाळाला त्याच्या नावाचा अर्थ विचारला, तर कोरोनाशी लढण्यासाठी कोरोना योद्ध्यांनी कसे काम केले, त्यांच्या कामाप्रती एक आदर म्हणून हे नाव ठेवण्यात आले, असे सांगता यावे म्हणून हे नाव ठेवल्याचे सोहेलने सांगितले.
लॉकडाऊन दरम्यान आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य कर्मचारी तसेच, पोलीस यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी, अन्नपुरवठा कर्मचारी हे अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्या कामाचा आदर म्हणून सोहेलने आपल्या मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे.