भुबनेश्वर - ओडिशात 'फनी' चक्रीवादळाने आज सकाळपासूनच थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमिवर ११ लाख पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यामध्ये जवळपास ६९१ गर्भवती महिलांचाही समावेश होता. या धावपळीत एका महिलेची प्रसुती करण्याचा प्रसंग आला. चक्रीवादळावरून बाळाचे नावही फनी ठेवण्यात आले आहे.
ओडिशाला फनी वादळाने जोरदार झोडपले आहे. सकाळी ५ वाजल्यापासूनच किनारपट्टी भागात ताशी २४५ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारा वाहत होता. गुरुवारपासूनच नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या मदतीने हलवण्यात आले होते. याच धावपळीत एका महिलेची प्रसुती करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
भुबनेश्वरच्या रेल्वे रुग्णालयात सकाळी ११.३० मिनिटांनी या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. संबंधित महिला रेल्वे विभागातच कर्मचारी आहे. तेथे ती कोच दुरुस्ती विभागात मतदनीस म्हणून काम करते. मुलीला जन्म दिल्यानंतर फनी चक्रीवादळावरून तिचे नावही फनी ठेवण्यात आले. माता आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप आहेत.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तेथील सुरक्षेवर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भुबनेश्वरमध्ये जीवनावश्यक वस्तूंनी अनेक ट्रक भरून ठेवण्यात आले आहेत. आपातकालीन स्थितीत त्यांचा उपयोग करण्यात येईल. तर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सर्व परिस्थिती स्वतः हाताळत आहेत.