कांठमाडू - पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी अयोध्या हा नेपाळचा एक भाग असून श्री राम हे नेपाळी नागरिक होते, असा दावा केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांना या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्यास सांगितले.
दोन वर्षांपूर्वी ओली यांच्याशी अयोध्या आणि श्री राम यांच्यासंदर्भात चर्चा केली होती. तेव्हा मी ओली यांना या संदर्भात कोणतेही पुरावे न देता वक्तव्य करण्याबद्दल बजावले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती बामदेव गौतम यांनी सांगितले.
प्रत्येक व्यक्ती भिन्न धर्म पाळते. त्यांच्या धार्मिक श्रद्धांना लक्ष्य करून कुणाच्याही भावनांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करु नये. त्याचप्रमाणे कोणत्याही देशाने, समुदायाने किंवा व्यक्तीने स्वार्थासाठी धर्माचा वापर करू नये, असेही गौतम म्हणाले.
भगवान राम यांच्या जन्मस्थळाविषयी पंतप्रधानांच्या विधानामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला आहे. म्हणून, पंतप्रधानांनी याप्रकरणी माफी मागावी. तसेच या विषयाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासकारांचा एक संघ स्थापन करण्याची विनंतीही मी त्यांना करतो, असे गौतम म्हणाले.
आपण नेपाळच्या राजकीय पक्षांचा, नेत्यांचा अवमान आणि अवमूल्यन करू नये. वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून, विधाने करणे टाळावे. याचा राष्ट्राला आणि समाजाला फायदा होत नाही. आपण आपल्या नवीन पिढीला काय शिकवत आहोत? आपण देशभक्त होऊया आणि विवेकबुद्धीचा उपयोग करूया, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे सत्ता वाचवण्यासाठी सतत भारतावर आरोप करत आहेत. भारताने सांस्कृतिक अतिक्रमण करत नकली अयोध्या निर्माण केली. पण खरी अयोध्या ही नेपाळमध्ये आहे, असा दावा ओली यांनी केला. नेपाळमधील नेत्यांनी पंतप्रधानांच्या विधानाची थट्टा उडवल्यानंतर तेथील परराष्ट्र मंत्रालयाकडून सारवासारव करण्यात आली आहे. हे विधान कुठल्याही राजकीय मुद्द्याशी संबंधित नव्हते. तसेच कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.