नवी दिल्ली - भारत नेपाळ यांच्यातील संबंधात तणाव असतानाच नेपाळने आणखी एक कुरापतीचा निर्णय घेतला आहे. हिमालयीन पर्वत रांगेत आंतरराष्ट्रीय सीमेजवळील वादग्रस्त सुस्ता प्रदेशाजवळ नेपाळ सरकारकडून 4 हेलिपॅड बांधण्यात येत आहेत.
सशस्त्र सीमा दलाच्या अधिकृत अहवालानुसार सुस्ता येथील वार्ड क्रमांक चार जवळ नेपाळकडून चार हेलिपॅडचे बांधकाम सुरू आहे. त्यातील एक हेलिपॅड बांधून पूर्ण झाले आहे. या 4 हेलिपॅडसाठी नेपाळ सरकारने तब्बल दहा एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.
एका वरिष्ठ पत्रकारांच्या माहितीनुसार गंडक नदीच्या पूर्वेला जो प्रदेश तो बिहारच्या पश्चिम चंपारण्यचा जिल्ह्याचा एक भाग असल्याचा दावा भारताकडून करण्यात येतो. सुस्ता ग्रामपंचायत नेपाळच्या पश्चिम नावलपारसी जिल्हयाच्या अखत्यारित येते. त्यामुळे हा वादग्रस्त प्रदेश म्हणून ओळखला जातो
सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या अंतर्गत गुप्तचर दलाकडून या हेलिपॅड निर्मिती बाबत माहिती मिळाली, अशी माहिती 21 ब्रिगेडचे कमांडंट राजेंद्र भारद्वाज यांनी दिली.
पूरग्रस्तांना मदत करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत अन्न व औषध पुरवठा करणे, या हेतूने या हेलिपॅडचा वापर करण्यात येणार असल्याचा दावा नेपाळ कडून करण्यात येत आहे. मात्र या वादग्रस्त भूभागावर कधीच पूर आला नाही. तसेच यापूर्वीच हेलिपॅडचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे, याची नोंद घेणे गरजेचे आहे.