भुवनेश्वर - ओडिशातील देवगड जिल्ह्यात काही पुरातन बौद्ध स्मारके आहेत. देवगड जिल्ह्यात ब्राह्मणी नदीच्या काठी अक्षरशिला हे नयनरम्य गाव वसलेले आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाचा पुरावा देणारा खडकांचा एक आश्चर्यकारक भाग या गावात आहे. मात्र, पुरातत्व विभाग आणि शासन दोघांचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
नदीच्या पात्रातील अनेक खडकांवर प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची चित्रे असलेले कलात्मक शिलालेख आहेत. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून दुर्लक्षित असल्यामुळे हे शिलालेख ब्राह्मणी नदीच्या पाण्यात बुडून गेले आहेत.
पौराणिक कथांनुसार, आठव्या शतकात नालंदा येथील बौद्ध भिक्षू ओडिशातील रत्नागिरी शहराकडे जाण्यासाठी ब्राह्मणी नदी पात्राचा उपयोग करत. येथे विश्रांती घेताना त्यांनी प्राचीन 'पाली' भाषेत या खडकांवर काही मजकूर आणि चित्रे कोरली आहेत. नंतर बामांडाचा राजा सारा बासुदेबा सुधाल देब यांनी या शिलालेखांना शोधून काढले. त्यांनी येथे एक वस्ती वसवली. खडकावरील शिलालेखांनुसार राजाने या ठिकाणाचे नाव अक्षरशिला ठेवले.
या खडकांवरील शिलालेखांशिवाय बर्कोट ब्लॉक पाषाणात तयार केलेली अनेक बौद्ध स्मारके ब्राह्मणी नदी पात्रात सापडली आहेत. मात्र, ब्राह्मणी धरण प्रकल्पामुळे यापैकी अनेक स्मारक बुडाली आहेत. उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे झाल्यावर या स्मारकांचे तुकडे दिसू लागतात. दुर्दैवाने या स्मारकांच्या संवर्धनाकडे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारने अजिबात रस दाखवला नाही.
या दगडी स्मारकांचे जतन केले गेले तर या ठिकाणी ओडिशामधील मुख्य पर्यटन स्थळ तयार होऊ शकते, असे अनेक संशोधक, अभ्यासक आणि इतिहासकारांचे मत आहे.