मुंबई - नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात नलिन खंडेलवाल देशात पहिला आला आहे. त्याने ७२० पैकी ७०१ गुण मिळवले आहेत. तर महाराष्ट्रातील सार्थक भट हा देशात सहाव्या स्थानी आहे. पहिल्या ५० टॉपरमध्ये राज्यातील तिघांचा समावेश आहे. तर मुलींमध्ये दिशा अग्रवाल राज्यात टॉपर आहे.
महाराष्ट्रातले हे विद्यार्थी टॉप ५० मध्ये -
सार्थकसह देशातील पहिल्या ५० टॉपर्समध्ये राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश असून साईराज माने आणि सिद्धांत दाते अशी इतर दोघांची नावे आहेत. हे तिन्ही विद्यार्थी पुण्यातील डीपर या संस्थेचे आहेत.
मुलींमध्ये तेलंगणाची माधुरी रेड्डी प्रथम -
तर देशात मुलींमध्ये तेलंगणाची माधुरी रेड्डी प्रथम तर मध्य प्रदेशातील किर्ती अग्रवाल ही दुसरी आली आहे. राज्यातून दिशा अग्ररवाल ही मुलींमध्ये टॉपर ठरली आहे. ती ५२ व्या रँकवर आहे.
इतके मिळवले गुण -
सार्थक भट हा नाशिक येथील असून तो देशातील टॉपरमध्ये सहाव्या स्थानी तर राज्यातील पहिला टॉपर ठरला आहे. त्याला एकुण ६९५ गुण मिळाले आहेत. तर सांगलीच्या साईराज माने याला ६८६ गुण मिळाले असून तो देशात ३४ व्या तर राज्यात दुसऱ्या रँकवर आहे. जुन्नर येथील सिद्धांत दाते याने ६८५ गुण मिळवून देशात ५० व्या आणि राज्यात तिसऱ्या रँकवर येण्याचा मान मिळवला आहे.
दरम्यान सर्व विद्यार्थी एकाच वेळी नीटच्या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी आल्याने संकेतस्थळ बंद पडले आहे.