नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक कोरोना चाचण्यांची नोंद झाली. तसेच, देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही २० लाखांच्या जवळपास पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. देशातील कोरोना मृत्यूदर हा दोन टक्क्यांच्याही खाली आहे. तसेच, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या २.९३ टक्के आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये जवळपास ९ लाख कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
दिवसभरात एकूण ८ लाख ९९ हजार ८६४ कोरोना चाचण्यांची नोंद करण्यात आली. तर आतापर्यंत १९.७० लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर दिवसाला ५५ हजार एवढा आहे. तर आतापर्यंत एकूण तीन कोटीहून अधिक लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे, असेही भूषण यांनी सांगितले.
हेही वाचा : देशातील कोरोना परिस्थितीबाबत संसदीय स्थायी समितीची उद्या बैठक