पाटणा - मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए) आगामी बिहार निवडणुकीत २२० जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी व्यक्त केला. राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, एनडीएचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला अद्याप ठरला नाही.
केंद्रीय गृहराज्य मंत्री म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली देशात अनेक विकासकामे झाली आहेत. कोरोना काळात वंचित आणि गरीबांना मोठी मदत करण्यात आली. याबरोबरच अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे, हे मुद्दे बिहार निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत'. राज्यात २२० जागा जिंकल्यानंतर नितिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए बिहारमध्ये सत्ता स्थापन करेल, असेही राय म्हणाले.
निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर राय पत्रकारांशी बोलत होते. राजधानी पाटणामध्ये भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज(शनिवार) बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. आत्मनिर्भर भारतचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बिहार बनविण्यात येईल. उद्योगधंदे उभारण्यात येतील. शेती आधारित उद्योगधंदे सुरू करण्यास राज्यात मोठा वाव आहे. अन्न प्रक्रिया, मस्त्यपालन यासह अनेक उद्योग सुरू करता येऊ शकतात, असे राय म्हणाले.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जे. पी नड्डा बिहार दौऱ्यावर आले आहेत. २४३ जाागांसाठी राज्यात ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणूक आयोगाने अद्याप तारीख जाहीर केली नाही. मात्र, राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.