नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. त्यातच, आप नेते एन. डी. शर्मा यांनी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बादरपूर मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मिळावे, यासाठी सिसोदियांनी आपल्याकडे दहा कोटी रुपयांची मागणी केल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
"मनीष सिसोदिया यांनी मला आपल्या घरी बोलावले आणि सांगितले, की बादरपूर मतदारसंघातील तिकिटीसाठी राम सिंह (ज्यांना आत्ता उमेदवारी मिळाली आहे) हे आम्हाला २० ते २१ कोटी रूपये देण्यास तयार आहेत. तुम्ही किती देण्यासाठी तयार आहात? तुम्ही आम्हाला दहा कोटी द्या. त्याला उत्तर म्हणून मी सांगितले, की मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे, त्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत." अशी माहिती शर्मांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले, की आम आदमी पक्ष हा उमेदवारी देण्याच्या बदल्यात उमेदवारांकडून पैसे उकळत आहे. अशा कितीतरी जागा आहेत, जिथे सध्याच्या आमदारांचे तिकिट कापून, पैशाच्या जोरावर दुसऱ्याच उमेदवाराला तिकिट देण्यात आले आहे. हे सर्व पाहून मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी लोकांमध्ये जाऊन इथल्या भ्रष्ट नेत्यांचे चेहरे समोर आणणार आहे. बादरपूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.
याआधी सोमवारी, काँग्रेस नेते, आणि बादरपूरचे माजी आमदार राम सिंह नेताजी यांनी आणखी तीन नेत्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी मुख्यमंत्री केजरीवालही उपस्थित होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान पार पडेल, तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.