रांची : झारखंडच्या चतरा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी काही वाहने पेटवल्याची घटना समोर आली आहे. बचरा रेल्वे सायडिंगच्या परिसरात हा प्रकार घडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळीबारही केला. गोळ्यांचा आवाज ऐकून रेल्वे सायडिंग परिसरात काम करणारे लोक पळून गेले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी तिथे उभ्या असलेल्या गाड्यांना आग लावली.
हा प्रकार नक्षल्यांनीच केल्याबाबत पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच तांडवाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आशुतोष सत्यम हे तातडीने अग्निशमन दल आणि पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच, पोलीस अधीक्षक ऋषभ झा देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
हा प्रकार नक्षलवाद्यांनीच केला की आणखी कोणी हे सांगणे सध्या खूप घाईचे ठरेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार पीएलएफआय नक्षलवाद्यांनी केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून, त्यानंतरच अधिकृत माहिती देण्यात येईल, असे झा यांनी सांगितले.
हेही वाचा : पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यास आलेल्या आमदारावर स्थानिकांनी फेकल्या चप्पला