पश्चिम सिंहभूम (झारखंड) - जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्राच्या मनमाडु बेडा जंगलात पीपल्स लिबरेशन फ्रंट आफ इंडिया (पीएलएफआय) आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यात 3 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. तर एक नक्षलवादी जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली.
टेबो ठाणे क्षेत्रातील मनमाडु बेडातील जंगलात पीएलएफआयचे काही सदस्य जमल्याची माहिती चाईबासा पोलिसांना मिळाली होती. यानंतर चाईबासा पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांनी संयुक्त स्वरूपात एक शोध मोहीम राबविली. पोलीस आणि पीएलएफआयच्या चकमकीत दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. या प्रत्युत्तरात पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात पीएलएफआयचा एरिया कमांडर शनिचर दस्तादेखील होता.
पोलीस अधीक्षक इंद्रजीत महथा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह जमा करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जंगलात शोध मोहीम सुरू आहे.