तरूण लोक हे नवोन्मेषी, सर्जनशील, उभारणी करणारे आणि राष्ट्राच्या भविष्याचे नेते असतात. परंतु योग्य शिक्षण, अचूक कौशल्ये आणि चांगले आरोग्य मिळाले तरच ते भविष्यात परिवर्तन घडवून आणू शकतात. ६०० दशलक्ष लोक म्हणजे भारताच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्या आता २५ वर्षांखालील आहे, आणि हे ६० कोटी तरूण आमचे जग बदलण्यासाठी सज्ज झाले आहेत. जगात आज १ अब्ज ८० कोटी तरूण लोक असून १० ते २४ या वयोगटातील आहेत. भारतात जगातील सर्वात मोठी तरूणांची लोकसंख्या असून, १० ते २४ वयोगटातील तरूणांची संख्या ३५ कोटी ६० लाख इतकी आहे. २६ कोटी ९० लाख तरूणांसह चीन दुसर्या क्रमांकावर आहे तर त्यापाठोपाठ इंडोनेशिया (६७ दशलक्ष) आणि पाकिस्तान (५९ दशलक्ष), नायजेरिया (५७ दशलक्ष), ब्राझिल (५१ दशलक्ष) आणि बांगलादेश (४८ दशलक्ष) आहे. संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधीच्या अहवालात ही आकडेवारी आहे. आज सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून, भारतात जगातील तरूणांपैकी १९ टक्के तरूण आहेत. भारताची तरुणाई ही त्याची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आणि सर्वाधिक होतकरू भाग आहे. ती भारताला सर्वात आगळावेगळा असा लोकसंख्याशास्त्रीय लाभ पुरवते. परंतु मानवी भांडवल विकासात योग्य प्रकारे गुंतवणूक केली नाही तर ही संधी गमावली जाऊ शकते.
भारत झपाट्याने आर्थिक, लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक आणि तांत्रिक परिवर्तनातून जात असल्याने, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये या विकासाचा वाटा जावा, याची खात्री केली पाहिजे. भारताच्या आर्थिक वाढीच्या विकासात तरूणाई उत्पादकतेने सहभाग घेण्यास सक्षम ठरली तरच भारत आपले उद्दिष्ट साध्य करता येईल. परंतु दुर्दैवाने, केवळ २.३ टक्के भारतीय कामगार वर्गाला शिक्षण सुरू असताना किंवा त्यानंतर (दक्षिण कोरियाच्या ९६ टक्के प्रमाणाशी तुलना करता) औपचारिक कौशल्य प्रशिक्षण मिळते आणि भारतातील २० टक्क्यांपेक्षाही कमी भारतीय पदवीधर कंपन्यांकडून त्वरित रोजगार मिळवण्यास सक्षम ठरतात. उर्वरित ८० टक्के तरूणांना रोजगार क्षेत्र स्विकारत नाही. २०१९ मध्ये, जागतिक जीडीपी क्रमवारीत भारत सहाव्या स्थानी असून जागतिक युवकांच्या संख्येपैकी १९ टक्के तरूण भारतात असूनही एकूण जागतिक जीडीपीच्या केवळ ३ टक्के जीडीपी उत्पादित करू शकला आहे. अमेरिका या यादीत सर्वोच्च स्थानी असून जागतिक तरूणांच्या लोकसंख्येपैकी फक्त ३ टक्के लोकसंख्या तरूण असूनही अमेरिका जागतिक जीडीपीच्या २५ टक्के जीडीपी उत्पादित करू शकली आहे. चीन दुसर्या क्रमांकावर असून जागतिक तरूण लोकसंख्येपैकी फक्त १५ टक्के तरूण असून एकूण जागतिक जीडीपीच्या १६ टक्के जीडीपी निर्माण करू शकला आहे.
या आकड्यांवरून भारतातील तरूणांची खरी क्षमता आणि देशाची एकूण जीडीपीची एकूण जागतिक जीडीपीतील टक्केवारी यातील मोठ्या तफावतीचे संकेत मिळतात.
विद्यमान स्थिती..
भारत सर्वात जास्त कौशल्याच्या तुटवड्याला सामोरा जात असून त्याचे प्रमाण ६४ टक्के आहे, जे वरून दुसर्या क्रमांकाचे सर्वोच्च आहे. २०१४ च्या ओईसीडीच्या अहवालानुसार, चीन इतर देशांबरोबर २४ टक्क्यांसह तळाशी आहे. २०२० मध्ये भारतातील उभरत्या नोकर्यांसंदर्भातील लिंकेडिनच्या अहवालानुसार, सध्याच्या बाजारपेठेत नवीन रोजगाराच्या भूमिकांवर प्रकाश टाकला आहे. ब्लॉक चेन विकसक, कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ, जावास्क्रिप्ट डेव्हलपर, रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन सल्लागार, बॅक एंड डेव्हलपर, विकास व्यवस्थापक, साईट रिलायेबिलिटी अभियंता, कस्टमर सक्सेस विशेषज्ञ, रोबोटिक्स अभियंता, सायबर सुरक्षा तज्ञ, पायथन डेव्हलपर, डिजिटल मार्केटिंग विशेषज्ञ, फ्रंट एंड अभियंते आदी नवे रोजगार झपाट्याने उदयास येत आहेत. हायपर लेजर, सॉलिडिटी, नोट.जेएस, स्मार्ट कॉँटॅक्ट, मशिन लर्निंग, डीप लर्निंग, टेन्सरफ्लो,पायथन प्रोग्रामिंक लँग्वेज, नॅचरल लँग्वेज प्रक्रिया ही सध्याची कौशल्ये असून त्यांच्या शोधात बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. २०१९ मध्ये, इन्फोसिसच्या टॅलंट रडार अहवालात आज प्रकल्प तयार करण्यासाठी ज्या ५ कौशल्यांना प्रचंड मागणी आहे, त्यांच्यावर प्रकाशझोत टाकला आहे.
ती कौशल्ये वापरकर्त्याचा अनुभव (६७ टक्के डिजिटल पुढाकार), विश्लेषण (६७ टक्के), ऑटोमेशन (६१ टक्के), आयटी आर्किटेक्चर (क्लाऊडसह) (५९ टक्के) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (५८ टक्के) ही आहेत. खरे सांगायचे तर, ही नवीन कौशल्ये देशातील कोणत्य़ाही विद्यापीठात किंवा तांत्रिक अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिकवली जात नाहीत. त्या संस्थांमधील तंत्रज्ञान शिकवणार्या प्राध्यापकांनी त्यांचे नावही ऐकले नाही. जागतिक स्तरावरील सध्याच्या स्पर्धात्मक रोजगार बाजारपेठेत तरूणांना तांत्रिक नोकर्यांसाठी योग्य बनवण्यातील ही मोठी समस्या आहे. वर्गखोलीत जे ज्ञान आणि कौशल्य शिकवले जाते आणि जागतिकीकरण झालेल्या उद्योगांमधील आवश्यकता यातील तफावत दिवसेंदिवस अधिकाधिक रूंद होत आहे. तरूणांना त्यांच्या कॅम्पसमध्येच या नवीन कौशल्यांबाबत प्रशिक्षित करण्यासाठी साधनसंपत्ती आणि योग्य प्राध्यापक असले त तरच ही तफावत भरून काढता येईल. व्यवसायाच्या डिजिटायझेशनमुळे नव्या तांत्रिक कौशल्यांसाठी मागणी प्रचंड वाढली असून सर्व उद्योगांमधील कंपन्या ते शोधण्यासाठी संघर्ष करत आहेत. जागतिक आर्थिक मंचाने असा अंदाज केला आहे की, २०२५ पर्यंत ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे ७५ दशलक्ष नोकर्या नष्ट होणार आहेत, पण, इतर १३३ दशलक्ष नवीन रोजगार तयार होणार आहेत. तरूणांना नव्या संधी घेण्यासाठी या नव्या तांत्रिक कौशल्यांवर तयार करणे ही देशासाठी गुरूकिल्ली आहे.
धोरणात्मक चौकट- कृती योजना..
भारताची शिक्षण प्रणाली अनेक तरूण पदवीधरांना रोजगारास अक्षम करून सोडते, कारण त्यांना महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर स्पर्धात्मक बाजारपेठेत तयार करण्यासारखे कोणतेही कौशल्य त्यांना देण्यात येत नाही. भारतातील बुद्धिमान तरूणांचा शोध घेणाऱ्या अस्पायरिंग माईंड्स या कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार, सध्याच्या ज्ञान अर्थव्यवस्थेत भारतातील ८० टक्क्यांहून अधिक अभियंते रोजगार मिळवण्यास पात्र नाहीत. असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने गेल्या वर्षी केलेल्या अभ्यासात असे आढळले की भारतातील फक्त ७ टक्के बिझनेस स्कूलमधील पदवीधर रोजगारक्षम आहेत. २०१८ मध्ये, भारतातील बेरोजगारीचा अंदाजित दर १०.४२ टक्के होता. गेल्या दशकासाठी, भारतातील तरूणांमधील बेरोजगारीचा दर १० टक्क्याच्या आसपास भटकतो आहे. भारत सरकारने व्यावसायिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतलेला स्टार्ट अप इंडिया, कुशल भारत मोहिमेची सुरूवात, कौशल्य विकास आणि व्यावसायिकतेसाठी समर्पित स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना, उद्योग प्रणित क्षेत्रीय कौशल्य मंडळांची स्थापना आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा कायापालट ही चांगली पावले योग्य दिशेने उचलली आहेत.
निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०१९-२० मध्ये, भारतातील उच्च शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रासाठी नवीन शिक्षण धोरण आणण्याची केलेली घोषणा ही ठळक होती. तरूणांच्या रोजगार आघाडीवर, तरूणांना रोजगारासाठी सुसज्ज बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना महत्वाचे कौशल्य प्रदान करण्यावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याचा सरकारचा इरादा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, भाषक प्रशिक्षण, इंटरनेट ऑफ थिंग्ज, थ्री डी प्रिंटिंग, आभासी वास्तव आणि बिग डेटा या क्षेत्रात तरूणांना प्रशिक्षित करण्यासाठी नवीन प्रशिक्षण कार्यक्रम लागू करण्यात येणार आहेत. या नव्या युगाच्या कौशल्यामुळे भारतातील तरूणांना देशात किंवा परदेशातही रोजगार मिळवण्यास सुसज्जता प्रदान करेल.
भारतीय तरूणाला सुयोग्य रोजगाराच्या संधी शोधण्यात समस्या येत असल्याने त्याला अधिक मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशनाची गरज आहे. ५१ टक्के तरूणांनी आम्हाला आमच्या कौशल्याला अनुरूप अशा उपलब्ध नोकर्यांच्या संधीबाबत माहितीचा अभाव असल्याचे सांगितले असून हा महत्वपूर्ण अडथळा आहे. सुमारे ३० टक्के तरूणांनी आपल्याला कोणत्याही प्रकारचे समुपदेशन किंवा मार्गदर्शनाच्या संधीचा अभाव असल्याचे सांगितले आहे. किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य येण्याच्या प्रमाणात भारत आघाडीवर आहे. भारतात ४ पैकी १ किशोरवयीन मुलगा नैराश्याची शिकार झालेला आहे. २०१९ मध्ये मुंबईत झालेल्या इंडिया टुडे संमेलनातील माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत, भारतात ४० हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि दर तासाला एक असा दर आहे.
किशोरवयीन नैराश्याचे निदान करणे आणि उपचार अधिकच अवघड आहे. तरूण प्रौढांमध्ये प्रत्येक ५ मध्ये एकाला उच्च रक्तदाब असतो ज्याची एकूण संख्या ८ कोटी असून जी संपूर्ण इंग्लंडच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. देशातील तरूणांची वास्तव उर्जा मारून टाकण्याची क्षमता या समस्यांमध्ये असल्याने या आरोग्या समस्या तातडीने सोडवण्याची गरज आहे. म्हणून, दर्जेदार शिक्षण आणि तरूणांच्या कौशल्य विकासाव्यतिरिक्त, सरकारने आरोग्याच्या मुद्यांचीही काळजी घेतली पाहिजे. सुदृढ तरूण हा देशाची खरी ताकद आहे. भारतात तरूणांचा विकास करताना, आपल्याला देशाच्या ग्रामीण भागात राहणार्या तरूण लोकांची तसेच संपूर्ण देशात विद्यार्थिनींची संख्या विचारात घ्यायला हवी. तरूणांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि ग्रामीण भागातील तरूणांच्या आणि विद्यार्थिनींच्या आरोग्याशी संबंधित पैलू याबाबत आपण स्वतंत्र धोरणे आखली पाहिजेत.
देशातील विविध वर्गवारीतील तरूणांच्या सर्व मुद्यांवर विचार करण्यासाठी एकसामायिक धोरण उपयुक्त ठरणार नाही. याला जोडून आपल्याला देशातील सहस्त्रकातील आणि जनरेशन झेड अशा उपगटांचाही विचार केला पाहिजे. तरूणांच्या सक्षमीकरणात तंत्रज्ञान अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असते. जग आज इंटरनेट आणि मोबाईल संपर्कावर चालते. सर्व ठिकाणी आणि सर्व वेळा इंटरनेट उपलब्ध असणे ही विकासाची गुरूकिल्ली आहे. सध्याची पिढी जनरेशन झेड ही संगणक, लॅपटॉप, आयपॅड, स्मार्ट फोन यासह तंत्रज्ञानाचा वापर करण्यात चांगली असल्याने तंत्रज्ञानाचे शिक्षण प्रणाली आणि कौशल्य विकासात एकात्मिकीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. सरकारने आयटी पायाभूत सुविधा जशा की इंटरनेट सर्व्हर्स, डेटा सेंटर्स, संगणक सुविधा,ऑप्टिकल फायबर केबल जाळे, वाढीव इंटरनेट बँड विड्थ आणि उपग्रह संदेशवहन यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. तरूणांना तांत्रिक कौशल्याचा विकास आणि उत्पादकता वाढीसाठी त्याचा वापर करण्यात पाठबळ देण्याची कल्पना चांगली आहे.
देशातील आयआयटी, आयआयएम आणि एनआयटीमधील विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय स्तरावर समस्या सोडवण्यासाठी सुकाणु समित्या स्थापन करण्याची शिफारस जोरदारपणे करण्यात येत आहे. या संस्थांमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी हे खरेखुरे देशाचे उत्तमांश आहेत. म्हणून त्यांच्या सध्याच्या क्षमतेचा उपयोग करून समाजातील आणि देशातील काही ज्वलंत प्रश्नांचा आणि मुद्यांचा विचार करून तोडगा शोधण्याची कल्पना अत्यंत उत्तम असेल. संपूर्ण देशभरातून समस्या आणि मुद्दे गोळा करता येतील आणि या विद्यार्थ्यांसमोर विचार करण्यासाठी, विश्लेषण करून सर्वाधिक परिणामकारकरित्या सोडवण्यासाठी ठेवता येतील. ज्या विद्यार्थ्यानी किंवा विद्यार्थी गटांनी समस्या सोडवण्यात असाधारण कामगिरीचे प्रदर्शन केले आहे, त्यांना अगदी शैक्षणिक श्रेयही देता येईल. संपूर्ण देशातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये ही कल्पना आणखी पुढे राबवता येईल ज्यामुळे तरूण पिढी प्रत्यक्षात देशातील समस्यांवर लहान वयातच विचार करण्यास सुरूवात करेल. या कल्पनेने तरूण पिढीला राष्ट्रउभारणी आणि विकासात आपोआपच सहभागी केले जाईल. कामाच्या ठिकाणी आता मशिनची उपस्थिती सक्तीची झाली आहे आणि जगभरात ती वाढतच आहे.
गार्टनरने असा अंदाज केला आहे की सर्व जगभरात लहान आणि मोठे दोन्हीही, रोबोंची संख्या २०१५ मध्ये जी ४.९ अब्ज होती, ती आता २०२० मध्ये २५ अब्जाहून अधिक होईल. म्हणून, तरूणांना भविष्यात या मशिन्सबरोबर काम करताना येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार केले पाहिजे. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण स्तरावर लहान रोबोटिक्स कार्यशाळा आयोजित करून हे करता येईल. देशातील तरूणांच्या मनात जीवनभर शिक्षणाचे धोरणाचा पैलू विकसित केला पाहिजे. जागतिकीकरण झालेल्या विश्वात झपाट्याने बदलत चाललेल्या उद्योगांच्या गरजांनुसार आपली कौशल्ये अद्ययावत करून नेहमीच विद्यमान स्थितीत ठेवणे त्यांना सहाय्यकारी होईल. आईवडील आणि शिक्षक प्राथमिक शिक्षणाच्या वेळेसच मुलांच्या क्षमता आणि सामर्थ्याचा विकास करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका निभावू शकतात. आईवडील आणि शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे करता येईल. प्राथमिक शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्याच्या क्षमता विकसित करण्यात शिक्षक एकटा संपूर्ण भूमिका बजावू शकत नाही. प्राथमिक शिक्षणाच्या वेळेस आईवडलांचे महत्व आणि जबाबदारी प्रत्यक्षात अधिक असते. उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या वेळेस देशासाठी विद्यार्थ्यांना अधिक उत्पादक बनवण्याच्या दृष्टीने त्यांच्यात इच्छित परिणाम घडवण्यासाठी शिक्षकांची भूमिका वाढलेली असते. देशात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मानसशास्त्रज्ञ आणि विद्यार्थी समुपदेशक यांनाही समाविष्ट करून घेतले पाहिजे.
हेही वाचा : कृत्रिम बुद्धिमत्ता - शेतीतील पुढचा टप्पा!