नवी दिल्ली - मासिक पाळी सुरू नसल्याचे सिद्ध करण्यासाठी तब्बल ६८ विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार गुजरात राज्यातील भूज जिल्ह्यामध्ये घडला. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.
ही घटना घडल्यानंतर विद्यार्थिनींनीही आंदोलन सुरू केले आहे. तसेच प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगाने मुलींना हीन वागणूक दिल्याप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांकडे उत्तर मागितले आहे. तसेच गुजरात पोलीस आणि विद्यापीठाकडे अहवाल मागितला आहे.
हेही वाचा - धक्कादायक...! मासिकपाळी सुरू नसल्याचे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थिनींना काढायला लावली अंतर्वस्त्रे
आयोगाचे सदस्य मुलींची भेट घेवून चौकशी करणार आहेत. कच्छ विद्यापीठाचे कुलगुरू दर्शना ढोलकिया यांच्याकडेही आयोगाने उत्तर मागितले आहे. याबरोबरच गुजरातचे पोलीस महासंचालक शिवानंद झा यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास आयोगाने पोलिसांना सांगितले आहे.
काय आहे प्रकरण ?
'श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट' या महाविद्यालयातील वसतीगृहात राहणाऱ्या ६८ विद्यार्थिनींना मासिक पाळी सुरू आहे की नाही, पाहण्यासाठी अंतर्वस्त्रे उतरवण्यास सांगण्यात आले. वसतीगृहात मासिक पाळी सुरू असलेल्या विद्यार्थिनींसाठी नियम बनवण्यात आले आहेत. या नियमांचे काही विद्यार्थिनी उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने प्रशासनाने मुलीना अंतर्वस्त्रे काढायला लावली, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. मात्र, प्रशासन हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करत आहे. आता पोलीस आणि महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.