नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)ने २०१७ या एका वर्षात घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. २०१७ सालामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची देशभरामध्ये नोंद झाली आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये ३.६ टक्क्यांनी गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
एकूण गुन्ह्यांपैकी ३० लाख ६२ हजार गुन्हे भारतीय दंड विधानातील कलमांखाली दाखल झाले आहेत. तर १९ लाख ४४ हजार गुन्हे विशेष आणि स्थानिक कायद्यानुसार दाखल करण्यात आले आहेत. ही आकडेवारी २०१६ साली झालेल्या गुन्ह्यांपेक्षा जास्त आहे. २०१६ साली ४८ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद झाली होती.
२०१७ सालामध्ये गंभीर गुन्ह्यांपैकी सर्वात जास्त गुन्हे महिलांवरील अत्याचारासंदर्भात आहेत. भारतीय दंडविधानानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ३३ टक्के गुन्हे पती किंवा कुटुंबीयांकडून झालेल्या अत्याचाराबाबत, महिलांवरील हल्ले २७.०३ टक्के, महिलांचे अपहरण २१ टक्के, बलात्कार १०.३ टक्के आहेत, असे अहवालात नोंदवण्यात आले आहे.
या बरोबरच एखाद्या व्यक्तीवर शारीरिक हल्ला करण्यासंदर्भातील ९ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ४ लाख ९४ हजार घटनांमध्ये व्यक्ती जखमी झाल्या आहेत, असे गुन्हे नोंद आहेत. याबरोबरच २०१७ साली ५६ टक्के सायबर गुन्हे दाखल झाले. त्यातील ५६ टक्के गुन्हे आर्थिक फसवणुकीसंबधी आहेत.