नाशिक - राज्यभरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत वाढवण्याचा जाहीर केले आहे. मात्र, ज्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा भागातील उद्योग सुरू करण्याची मागणी औद्योगिक संघटनेने केली आहे. लॉकडाऊनच्या काळातील सर्व नियम पाळून उद्योग सुरू ठेवण्याचे आश्वासन देखील संघटनेने दिले आहे.
नाशिकमध्ये केवळ ३ रुग्ण असून त्यांनाही प्रवासाची हिस्ट्री असल्याने नाशिक शहर आणि तालुक्यात कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात येथील उद्योगांना लॉकडाऊच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देऊन उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी नाशिक औद्योगिक संघटनांच्या वतीने निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांची भेट घेत ही मागणी केली आहे. या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत 20 तारखेला उद्योग सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याची माहिती शशिकांत जाधव यांनी दिली आहे.