नवी दिल्ली - चीनला जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या 'व्हर्चुअल मीटिंग'नंतर त्यांनी हे भाष्य केले. याचसोबत त्यांनी भारतीय लष्कराला कारवाई करण्याचे सर्व अधिकार दिल्याचे सांगितले. जवानांचे मरण व्यर्थ जाऊ देणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन सीमावादावर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मंत्रिमंडळाच्या ऑनलाइन मीटिंग नंतर त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी सैन्याला कारवाई करण्यासाठी योग्य ती सूट दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण देश भारतीय लष्कराच्या पाठिशी असल्याचे ते म्हणाले. भारतावर कोणीही आक्रमण केल्यास देश जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
लडाख प्रांतातील गलवान व्हॅलीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यात झटापट झाली. यावेळी कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसला, तरीही झटापटीत २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले. तसेच चीनच्या सैन्यातील ४२ जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये मृतांची संख्या देखील मोठी आहे. यानंतर सीमेवरील तणाव वाढला आहे.
कालपासूनच याबाबत मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील पंतप्रधानांची भेट घेतली. तसेच लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि सीडीएस बिपीन रावत यांच्यासोबत देखील बैठका पार पडल्या. यानंतर आज पंतप्रधान मोदी यांनी, वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
भारताने शेजारील राष्ट्रांशी कायम सहकार्याची भूमिका ठेवली. भारत शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही स्वतहून पाऊल उचलले नाही, असे ते म्हणाले. मात्र देशाचे स्वातंत्र्य, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी सर्व पावले उचलण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या शुक्रवारी (१९ जून) पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावल्याची पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली आहे.