नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी सांगत आहेत की, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा रंगीत फोटो काढण्यासाठी आपण १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हा फोटो ईमेलच्या सहाय्याने पाठवला होता. रंगीत फोटो प्रसिद्ध झाल्याचे पाहून लालकृष्ण आडवाणी यांना आश्चर्य वाटले होते, असे विधान मोदींनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे.
‘१९८७-८८ दरम्यान मी पहिल्यांदा डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. त्यावेळी फार कमी लोक ईमेलचा वापर करत होते. आडवाणी यांची रॅली होती. त्यावेळी डिजिटल कॅमेऱ्याची साइज मोठी होती. माझ्याकडे डिजिटल कॅमेरा होता. मी आडवणी यांचा फोटो काढला आणि दिल्लीला पाठवला. रंगीत फोटो प्रसिद्ध झाल्याचे पाहून लालकृष्ण आडवाणी यांना आश्चर्य वाटले होते,’ असे नरेंद्र मोदी यांनी या मुलाखतीत सांगितले होते.
मोदींच्या या दाव्यानंतर सोशल मीडिया युझर्स प्रतिक्रिया देत आहेत. युझर्सनी ट्विट करत म्हटले आहे, की पहिला डिजिटल कॅमेरा Nikon कंपनीने १९८७ रोजी विकला होता आणि कमर्शिअल ईमेल सेवा १९९०-९५ दरम्यान सुरू झाली होती. त्याआधीच मोदींनी १९८८ मध्ये याचा वापर केला होता.
माजी राज्यसभा खासदार शाहिद सिद्दीकी यांनी ट्विट करत म्हटले आहे, ‘नरेंद्र मोदी यांनी नाल्यातून गॅस तयार करण्याचे आणि रडारपासून वाचवणाऱ्या ढगांप्रमाणे डिजिटल कॅमेरा आणि ईमेलची निर्मिती केली आहे’. काँग्रेस नेत्या दिव्या स्पंदना यांनी ट्विट केलं आहे, ‘प्रश्न हा आहे की, १९८८ मध्ये जगात कोणाकडेही ईमेल आयडी नसताना यांचा ईमेल आयडी होता. अशावेळी यांना ईमेल तरी कोण पाठवत होते?’
याच मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइकसंबंधी विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइकदरम्यान तज्ज्ञांना ढगाळ वातावरण असल्याने मोहीम रद्द करण्यात येऊ नये, असा सल्ला दिल्याचे सांगितले होते. 'हल्ल्यापूर्वीचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञांचा होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता’ अशा प्रकारचे विधान मोदींनी केले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.