भोपाळ - मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे समर्थन केल्याप्रकरणी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांच्याविरोधात मुस्लीम देशांतून आंदोलन होत आहे. राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रानप्रती मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये मुस्लीम समाजाने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस खासदार अरिफ मसूद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काढण्यात आले आहे. एमॅन्युएल मॅक्रान यांनी माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
भारत सरकारने फ्रान्स सरकारशी असलेले संबंध तोडावे, अशी मागणी काँग्रेस खासदार अरिफ मसूद यांनी केली. राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांनी भारतीय मुस्लिमांच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे भारताने फ्रान्सशी असलेले संबंध तोडावे आणि आयात-निर्यात बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
काय प्रकरण?
फ्रान्समधील शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅक्रान यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लीम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लीम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.