पाटणा (बिहार) - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) २६ ऑक्टोबरला बिहारच्या मुंगेरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे. हिंसाचारावेळी पोलिसांनीच प्रथम गोळीबार केला होता, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर सीआयएसएफने नंतर हवेत गोळीबार केला होता.
त्यानंतर स्थानिक लोकांपैकी काहींनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात स्थानिक पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेता, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सीआयएसएफचे 20 सैनिक आणि अर्धसैनिक दल असलेले एक पथक तेथे तैनात करण्यात आले.
दुसऱ्या बाजूला जोरदार दगडफेक आणि परिस्थिती नियंत्रणात नसल्यामुळे, सीआयएसएफच्या जवान एम. गंगाय्या याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेत 13 राऊंड फायर केल्या. हवेत गोळीबार झाल्यानंतर दीनदयाल उपाध्याय चौकातून जमाव पसार झाला, असे अहवालात म्हटले आहे. शुक्रवारी, मुंगर पोलिसांनी दावा केला, पुरब सराय पोलिस ठाण्यातून 100 राऊंड गोळ्या आणि दोन मॅगझिन्स गायब आहेत. तर, पोलिसांच्या कारवाईवर समाधानी नसलेल्या आंदोलनकर्त्यांनी गुरुवारी या पोलीस ठाण्याची तोडफोड केली.
स्थानिक रहिवाशांनी असा दावा केला की, सोमवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास मुंगेर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. यापूर्वी बिहार पोलिसांनी दावा केला होता, हा गोळीबार पोलिसांनी नाही तर, काही समाजकंटकांनी केला आहे. नवरात्रोत्सवानंतर स्थानिक दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जात असताना हिंसाचार झाला होता.