मुंबई - तिसऱ्या टप्यातील निवडणूक संपल्यानंतर चौथ्या टप्यातील निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मतदानाचा घसरता टक्का लक्षात घेता विविध ठिकाणी मतदानाविषयी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात जनजागृती मोहिम घेण्यात आली. यावेळी नृत्याच्या माध्यमातून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आज झालेल्या मतदार जनजागृती फ्लॅश मॉबला उपस्थित प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला. पात्र मतदारांनी 29 तारखेस मतदान करावे यासाठी जनजागृती करण्यास मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्याकडुन या फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानकात आज दुपारी प्रवाशांची लोकल ट्रेन पकडण्याची लगबग सुरु असतानाच 20 तरुण-तरुणींनी फ्लॅश मॉब करत उपस्थित प्रवाशांचे लक्ष वेधून घेतले. या तरुणाईने फ्लॅश मॉब मधून मतदान करा, आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावा असे आवाहन मुंबईकरांना केले.
मुंबई शहर जिल्हयात 30 मुंबई दक्षिण मध्य व 31 मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदार संघ येत असून यात 24 लाख 57 हजार 026 पात्र मतदार आहेत. मुंबईत 29एप्रिल 2019 रोजी मतदान होत असून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येत आहे. पृथ्वी इनोव्हेशन ग्रुपचे 25 तरुण- तरुणी फ्लॅश मॉबच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करीत आहेत.
मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शिवाजी जोंधळे जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून हे जनजागृती अभियान साकारले आहे. आतापर्यंत दादर, परेल, नरिमन पॉईन्ट येथे फ्लॅश मॉब झाले आहेत.
चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वरळी, गेट वे ऑफ इंडिया, CR2 मॉल येथे फ्लॅश मॉबचे आयोजन करण्यात येणार आहे.