इंदौर - भारतातील अनेक शहरे प्लास्टिक कचर्याचा सामना करण्यासाठी धडपडत असताना मध्यप्रदेशातील एका गावाने मात्र आदर्श निर्माण केला आहे. प्लास्टिक वापरावर यशस्वीरित्या बंदी घालून केवळ 80 दिवसांत हे गाव प्लास्टिक मुक्त झाले आहे. इंदौरपासून १० किमी अंतरावर असलेले सिंदोदा, असे या प्लास्टिक मुक्त गावाचे नाव आहे. या गावाला 'ब्लू व्हिलेज'(निळे गाव) म्हणून देखील ओळखले जाते.
या गावातील घरांना निळा रंग दिलेला आहे. घरांच्या भिंतींवर प्लास्टिकविरोधी घोषवाक्य आणि स्वच्छतेविषयक म्हणी लिहल्या आहेत. या गावात एकूण 380 घरे आहेत. महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त या गावकऱ्यांनी आपले गाव प्लास्टिकमुक्त घोषित केले आहे.
सिंदोदा ग्रामपंचायतीने ऑक्टोबरमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी शिक्षित केले. त्यानंतर केवळ 80 दिवसांच्या कालावधीत ग्रामस्थांनी प्लास्टिकचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला स्थानिकांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागला. परंतु. लवकरच त्यांनी किराणा सामान आणि इतर सामान ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक बॅग वापरण्यास सुरुवात केली.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : भिलाई शहरात अनोखी भांड्यांची बँक, पाहा खास रिपोर्ट
एकल-वापरलेले प्लास्टिक टाकण्यासाठी गावात पुठ्ठा डस्टबिन ठेवलेले आहेत. प्रत्येक दुकान आणि घरामध्ये प्लास्टिकच्या वापरावर नजर ठेवण्यासाठी सुमारे 10 कार्यसंघ आहेत. लोकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामपंचायत इमारतीच्या जवळील झाडाला कपड्यांच्या पिशव्याही सजवल्या आहेत. त्यानंतर 'स्वच्छ भारत' मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे 'निळे गाव' प्रयत्न करत आहे.