भोपाळ - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मध्यप्रदेशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्षांनी १६ बंडखोर आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. सध्या सर्व आमदार कर्नाटकातील बंगळुरूमध्ये थांबले आहेत. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने आमदारांचे राजीनामे मंजूर न करण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आज ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश कमलनाथ सरकारला दिले होते.
आज कमलनाथ सरकारची शक्तीपरीक्षा
ज्या १६ आमदारांनी १० मार्चला राजीनामा दिला होता त्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहेत. आज सायंकाळी ५ वाजता कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. अन्यथा सत्तेवरून पायऊतार व्हावे लागणार आहे. हात दाखवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच पाचवाजेच्या आत बहुमत चाचणी पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
१६ बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश
कर्नाटकात थाबंलेल्या सर्व आमदारांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश न्यायालयाने कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
२२ आमदारांनी दिला होता राजीनामा
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर २२ आमदारही सरकारमधून बाहेर पडले. १० मार्चला या सर्व आमदारांनी राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्षांनी यातील मंत्री असेलल्या ६ जणांचे राजीनामे मंजूर केले होते. मात्र, १६ जणांचे मंजूर केले नव्हते. त्यांचे राजीनामे आता स्वीकारण्यात आले आहेत.