भोपाळ - देशभरात लागू असलेला लॉकडाऊन 14 एप्रिलला उठविण्यास आमचा पाठिंबा नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यव्यवस्थेला नक्कीच हानी पोहचेल. मात्र, नागरिकांचे जीव सर्वात महत्त्वाचे आहेत, असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशनेही लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
पंजाब, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगाणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल यांनी आधीच लॉकडाऊन वाढविला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फसन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यानंतर अनेक राज्यांनी संचारबंदी वाढविण्याची मागणी केली. तर ज्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार कमी आहे, त्या राज्यांनी काही सुट देण्याबाबत मत व्यक्त केले. गोवा राज्याने मत्स्य व्यवसाय सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. तर शेतीशी निगडीत काही कामे काही राज्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेश राज्यात 532 कोरोनाग्रस्त असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशभरात कोरोनाचे 7 हजार 367 रुग्ण आढळून आले आहेत. तर 273 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 715 जण पूर्णत: बरे झाले आहेत.