भोपाळ - मध्य प्रदेशात सध्या विधानसभा पोटनिवडणुकांचे वारे वाहत असून २८ जागांसाठी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणूक रॅली दरम्यान काँग्रेस शेतकरी संघटनेच्या (फार्मर सेल) एका नेत्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर टीका केली होती. ही टीका आक्षेपार्ह असल्याचे म्हणत भाजपने काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. दिनेश गुजर असे या काँग्रेस नेत्याचे नाव आहे.
रविवारी अशोकनगर येथील राजापूर गावात सभेत बोलताना गुजर यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 'भुके नंगे घर का'? असे म्हटले होते. या वक्तव्यानंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, असे भाजपचे प्रवक्ते रजनीश अगरवाल यांनी सांगितले होते. आता या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे.
गुजर यांच्या विरोधात कचनार पोलीस ठाण्यात काल (बुधवार) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमुख कपिल लक्षकर यांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी भाषणाची क्लिप जप्त करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
वैयक्तिक टीकेनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. यातून काँग्रेसचे गरिबांबद्दलचे विचार समोर येत असून त्यांचा खोटेपणा उघडा पडला असल्याचे चौहान म्हणाले. राज्यात २८ विधानसभा जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोट निवडणुका होणार आहेत.