भोपाळ - मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात दलित दाम्पत्याला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सध्या जखमी दाम्पत्यावर गुना जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने सात सदस्यीय समिती स्थापन केली असून पथक चौकशीसाठी गुना जिल्ह्यात पोहचले आहे.
सरकारी रुग्णालयात जाऊन काँग्रेस नेत्यांनी आज(शुक्रवार) दुपारी दोघांच्या तब्येतीची चौकशी केली. पोलिसांच्या मारहाणीनंतर या दलित जोडप्याने विष प्राशन केले होते. मध्यप्रदेश काँग्रेस कार्यकारिणीचे अध्यक्ष रामनिवास रावत आणि माजी मंत्र्यांचा समितीत समावेश आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेस समितीने केली आहे.
ईटीव्ही भारतशी बोलताना काँग्रेस नेते जैवर्धन सिंह म्हणाले, या घटनेची सगळीकडे निंदा करण्यात येत आहे. अनेक जणांचा या घटनेत सहभाग आहे. मात्र, अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. 24 तासानंतरही शिवराज सिंह चौहान सरकारने काहीही केले नाही. ही परिस्थिती पाहता काँग्रेसने सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या प्रकरणी आम्ही अहवाल तयार करणार असून राष्ट्रीय स्तरावर हा विषय मांडणार आहोत.
मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात अतिक्रमण विरोधी कारवाई करताना पोलिसांनी एका दलित शेतकरी कुटुंबाला मारहाण केली होती. जिल्ह्यातील जगनापूर चाक येथे ही घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस उपनिरिक्षकासह सहा पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे.