भोपाळ - शहरातील कोरोनाग्रस्त १२ दिवसाच्या मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्यामुळे सदर मुलीला घरी सोडण्यात आले, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
नऊ दिवसाचे अर्भक असतानाच संबंधित मुलीचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. यानंतर उपचारानंतर शुक्रवारी रात्री बाळाला सुटी देण्यात आली. ७ एप्रिलला सदर बाळाचा जन्म सुल्तानिया जनाना या शासकीय रुग्णालयात झाला. येथील एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कात बाळ आल्याने त्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर महिलेची चाचणी केल्यानंतर सदर महिला पॉझिटिव्ह आढळली आहे, असे बाळाच्या वडिलांनी सांगितले. आम्ही आमच्या मुलीचे नाव 'प्रकृती' असे ठेवले आहे कारण तिने आजारासोबतचे युध्द जिंकले आहे, असेही मुलीच्या वडिलांनी सांगितले.
प्रसृती झाल्यानंतर ११ एप्रिलला बाळ आणि त्याचा आईला सुटी देण्यात आली. यानंतर जेव्हा सदर रुग्णालयातील महिला आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली तेव्हा सदर कुटुंबाने रुग्णालयाशी संपर्क केला. यानंतर १९ एप्रिलला नवजात बाळाला कोरोनाची लागण झाली असल्याचे उघड झाले. मात्र, त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या आईसह त्याला १४ दिवस एका खासगी रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.