नारायणपेट (तेलंगणा) : आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमंजारो सर करून तेलंगणाच्या लक्ष्मीने गावासह जिल्ह्याचे नाव मोठे केलं आहे. लक्ष्मी नारायणपेठ जिल्ह्यातील मदारमंडळच्या चेनवार गावातील रहिवासी आहे. घरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही लक्ष्मीने शिक्षण सुरू ठेवले. विपरित परिस्थितीवर मात करत यश संपादन केले.
आधी गिर्यारोहणाची भीती वाटत असल्याचे म्हणणारी लक्ष्मी संधी मिळाल्यास जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्टचे शिखर सर करण्याची इच्छा असल्याचे सांगते. तिला भुवनगिरी रॉक क्लाइमिंग स्कूल आणि लडाख येथील प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. लक्ष्मी आणि तिच्या ग्रुपने १८ हजार फूट उंच असलेला सिल्क रूट पर्वत सर केला. यानंतर तिची इतर गिर्यारोहकांबरोबर किलीमंजारो अभियानासाठी निवड करण्यात आली.
किलीमंजारो हे आफ्रिकेतील टांझानिया देशातील शिखर असून याची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार ३४१ फूट एवढी आहे. लक्ष्मीने १५ फेब्रुवारीला एका विद्यार्थ्यासोबत चढाईल सुरुवात केली होती आणि २१ फेब्रुवारीला तिने हे शिखर सर केले. ती आपल्या यशाचे श्रेय तेलंगणा सरकारच्या गुरुकुल विद्यालय शिक्षण संस्थेला देते.
गिर्यारोहणाचे अभियान हे अत्यंत खडतर असते. यासाठी आधीपासूनच सर्व तयारी आणि प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. सर्वात आधी अभियानासाठी निवडलेल्या ठिकाणातील हवामानाच्या विपरित परिस्थितीचा अभ्यास करून त्यानुसार आपल्या शरीराला अनुकूल बनवावं लागते. अनेक अडचणी, लहानमोठ्या दुर्घटनांना पार करावे लागते. यासाठी कठिण परिश्रम आणि मेहनतीची गरज असते. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या प्रशिक्षणामुळेच सर्व संकटावर मात करत हे शिखर सर करू शकल्याचे लक्ष्मी सांगते.
घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे लक्ष्मीच्या शिक्षणाला तिच्या वडिलांचा पाठिंबा नव्हता. मात्र, तिने शासकीय संस्थेच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. भविष्यात 'आयएएस' बनन्याचे तिचे स्वप्न असून ती यासाठी शक्य तितकी मेहनत घेत आहे. एका छोट्याशा गावातून आलेल्या आणि समाज कल्याण शाळेत शिकणाऱ्या लक्ष्मीची ही साहसयात्रा भविष्यात तिच्या इतर सहकाऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.