तिरुवनंतपुरम (कोझिकोड) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व धार्मिक स्थळेही बंद होती. आता काही अटींसह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळे आपापल्यापरिने काळजी घेत आहेत. कुट्टीचिरा येथील मशिदीत गर्दी टाळण्यासाठी एक अनोखा पर्याय शोधण्यात आला आहे. मशिद चालवणाऱ्या समितीने लोकांना नमाज अदा करण्यासाठी स्मार्ट कार्ड देणे सुरू केले आहे.
समितीने नियमीतपणे मशिद येणाऱ्या नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले आहेत. हे कार्ड असणाऱ्या लोकांनाच मशिदीमध्ये प्रवेश दिला जातो. मशिदीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने सॅनिटायझर्सनी हात धुणे सक्तीचे केले आहे. या स्मार्टकार्डधारकांना आपली ओळखही कॅमेऱ्यावर सांगावी लागत आहे.
पहिल्यांदा येणाऱ्या व्यक्तीचा पत्ता आणि फोन नंबर सेव्ह करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा ठेवली गेली आहे. पुढील वेळी व्यक्तीला फक्त त्याचा स्मार्ट कार्ड क्रमांक सांगायचा आहे त्यानंतर त्याचा इतर तपशील आपोआपच भरला जातो, अशी माहिती मशिद समितीचे सदस्य असलेले मुहम्मद सज्जाद यांनी दिली.
स्मार्ट कार्ड स्वाईप केल्यानंतर मशिदीचा दरवाजा आपोआप उघडला जातो. यासाठी दारवाज्यांवर सेन्सर बसवण्यात आले आहे. लोकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे म्हणून मशिदीच्या आवारात खुणा देखील करुन ठेवण्यात आल्या आहेत.
9 जूनपासून धार्मिक स्थळे, मॉल आणि रेस्टॉरंट्स सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गरोदर महिला आणि कोरोना संशयित नागरिकांनी धार्मिक स्थळांना भेटी देऊ नये, असे केरळ सरकारने सांगितले आहे.