नवी दिल्ली – उत्तराखंड राज्यातील टिहरी गढवाल येथील रहिवाशी असलेले कमलेश भट्ट यांचा मृतदेह दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआईए) नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. मागील आठवड्यात कमलेशचा मृतदेह इमिग्रेशन बाबतील काही अडचणींमुळे अबू-धाबी परत पाठवण्यात आला होता. कमलेश आबू धाबीमध्ये नोकरी करत होते व ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
कमलेशचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने १७ एप्रिल रोजी झाला होता. २३ एप्रिलला त्याचा मृतदेह दिल्ली विमानतळापर्यंत आणला होता. परंतु काही अडचणींमुळे त्याचा मृतदेह पुन्हा अबू धाबीला परत पाठवण्यात आला होता.
कमलेशचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा लहान भाऊ विमलेश यांनी ईटिव्ही भारतला सांगितले, की मागील काही दिवसांपासून जे घडत होते ते भारत सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट होती. यामुळे दोन्ही देशातील संवादप्रक्रियेमध्ये समन्वयाचा स्पष्ट अभाव दिसत होता. त्यांनी ईटीव्ही भारतचे आभार मानत म्हटले होते, की मला ईटीव्ही भारत आणि अन्य मीडियाच्या सहकार्यामुळे माझ्या भावाचा मृतदेह परत मिळाला.
विमलेश यांनी सांगितले, की माध्यमामुळेच हा प्रकार सरकारच्या समोर आणला. विमलेश यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचेही आभार मानले. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळेच आपल्या भावाचा मृतदेह भारतात परत आणला गेला.