नवी दिल्ली - शहरातील ईशान्य भागात असलेल्या श्री राम कॉलनीतील १०० पेक्षा जास्त मुस्लीम महिलांनी भाजपच्या सदस्यता अभियानांतर्गत भाजपमध्ये प्रवेश केला.
या वेळी खासदार मनोज तिवारी म्हणाले, सत्तर वर्षे काँग्रेसने मुसलमानांना धाकात ठेवत सत्ता बळकावली. मात्र, कोणीही त्याची दखल घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास' हा फक्त नाराच दिला नाही तर तो विश्वास संपादन करण्याच्या दिशेने पावले देखील उचलली आहेत.
एवढ्या मोठ्या संख्येत मुस्लीम महिलांनी पक्षात प्रवेश करणे, एका नव्या बदलाची नांदी आहे. या सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून, येणाऱ्या काळात नरेंद्र मोदींच्या प्रति अल्पसंख्याक लोकांच्या मनात विश्वास आणखीन दृढ होईल, अशी आशा देखील त्यांनी या वेळी व्यक्त केली.
भाजप सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत आहे
मनोज तिवारी म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी पक्ष आहे. आम्हाला सर्व लोकांपर्यंत पोहचायचे आहे, कारण आमचे मन साफ आहे.
ते पुढे म्हणाले, काही लोकांनी देशाला धर्माच्या नावावर विभागण्याचा प्रयत्न केला. पण, भाजप देशात सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करीत आहे. आम्ही नरेंद्र मोदींचे लक्ष पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे निघालो आहोत. नविन भारताच्या निर्मितीला सुरुवात झाली आहे. आता कोणतीही शक्ती या विकास रथाला थांबवू शकत नाही.
पक्ष आणि मुस्लिमांमधील दरी अरूंद होत आहे
भाजप अल्पसंख्याक मोर्च्याचे अध्यक्ष मोहम्मद हारून म्हणाले, भाजपने सुरू केलेल्या सदस्यता अभियानाच्या अंतर्गत एक कार्यक्रम श्री राम कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेला होता. ही खूप आनंदाची बाब आहे की, अल्पसंख्याक लोकांना पक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पक्ष आणि मुस्लिमांमधील दरी अरूंद होत आहे. मागील पाच वर्षांपासून मुस्लिमांमधे पक्षाविषयी जवळीक आणि विश्वास वाढत असून तो यापुढे आणखीन वाढेल,अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.