नवी दिल्ली - 'अर्थव्यवस्थेत मंदी असल्याचे मोदी सरकार मानायला तयार नाही. जोपर्यंत समोर असलेल्या अ़डचणींवर लक्ष देत नाही, तोपर्यंत त्यावर आपण चांगला पर्याय शोधू शकत नाही, असे मत माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. नियोजन मंडळाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी लिहलेल्या पुस्तकाचे दिल्लीत अनावरण करताना सिंग बोलत होते.
'काँग्रेस सरकारमधील चांगल्या आणि वाईट गोष्टींवर कायम वादविवाद होत आले आहेत, आणि असे वादविवाद झाले पाहिजे. आता आपल्याकडे असे सरकार आहे, जे 'मंदी' हा शब्दच मान्य करायला तयार नाही. हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. तुम्ही जर एखाद्या अडचणीचा सामना करत असाल आणि ती तुम्ही मान्य करत नसाल तर तुम्ही त्यावर चांगला उपायही शोधू शकत नाही. हे खूप भयंकर आहे, असे सिंग म्हणाले.
माँटेकसिंग अलुवालिया यांच्या पुस्तकात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था ही फक्त आपली मनातली इच्छा आहे, असे म्हटले आहे, त्याचा ही मनमोहन सिंग यांनी दाखल दिला. २०२४ -२५ पर्यंत ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याची सरकारची इच्छा आहे. मात्र, पुढील ३ वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट होईल वाटत नाही, असे सिंग म्हणाले.
विकास दर वाढवायचा असेल तर वित्तीय धोरणाचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा. वित्तीय सुधारणा आणि कर सुधारणा गरजेच्या असल्याचे ते म्हणाले. जर देशाचे आर्थिक चित्र पाहिले तर वित्तिय तुट ९ टक्क्यापर्यंत गेली आहे. वित्तीय आणि कर सुधारणे बरोबरच बांधकाम, आरोग्य, शिक्षण, संरक्षण या क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी येत्या काळात पावले उचलेले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुधारणा आणण्यासाठी नव्याने विचार करण्याची गरज आहे. देशापुढील प्रश्न सोडवण्यासाठी नव्याने मोठ्या प्रमाणात चर्चा घडून आली पाहिजे, असे सिंग म्हणाले.