दिसपूर - गोमांस विकल्याच्या संशयावरून एका वयोवृद्ध व्यक्तीवर जमावाने हल्ला केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. शौकत अली, असे पीडित व्यक्तीचे नाव असून मारहाण केल्यानंतर त्याला डुकराचे मांसही चारण्यात आले, असे म्हटले जात आहे. ही घटना आसामच्या बिश्वनाथ जिल्ह्यातील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये पीडित व्यक्तीला लोक घेरून बसलेले दिसत आहेत. तो चिखलात बसलेला असून त्याला गोमांस का विकले यावरुन जोर-जोरात प्रश्न विचारले जात आहेत. असामध्ये गोमासावर बंदी नाही. मारहाण केल्यानंतर त्याला डुकराचे मांसही बळजबरीने खाऊ घातले. त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.
या घटनेविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात पीडिताच्या कुटुंबांनी तक्रार नोंदवली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. हा सांप्रदायिक वादाचा प्रकार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५ व्यक्तींना अटक केली आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
अली याला यापूर्वीही तेथील स्थानिकांना गोमांस न विकण्याचा सल्ला दिला होता, असे काहींचे म्हणणे आहे. रविवारी बाजाराच्या दिवशी एक घोळका पीडित व्यक्तीच्या दुकानात आला आणि त्याला मारहाण करण्यास सरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तर, पीडित बांग्लादेशचा रहिवासी असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.