बरेली - उत्तरप्रदेशामधील बरेली बिथरी चौनपूर येथून भाजप आमदार असलेले राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांची मुलगी साक्षी मिश्राच्या प्रेमविवाहाला नवे वळण मिळाले आहे. साक्षी विवाह झाल्याची साक्ष म्हणून जे प्रमाणपत्र दाखवत आहे त्याला महंतांनी खोटे ठरवले आहे. दलित युवकासोबत विवाह केल्यानंतर सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओनंतर साक्षी मिश्रा चर्चेत आली होती.
साक्षीने अजितेशसोबत २ जुलैला पळून गेली होती. तिने ४ जुलैला प्रयागराज येथील प्राचीन रामजानकी मंदिरात विवाह केला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वी दोघांनी न्यायालयात धाव घेताना सुरक्षेची मागणी केली होती. यासाठी विवाहाचा पुरावा म्हणून दोघांनी रामजानकी मंदिरात केलेल्या विवाहाचे प्रमाणपत्र दाखवले होते. प्रमाणपत्रावर आचार्य विश्वपती जी शुक्ल यांचे नाव आहे.
ईटीव्ही भारतच्या पडताळणीत रामजानकी मंदिरात कोणत्याही प्रकारचा विवाह होत नसल्याचे समोर आले आहे. मंदिरात भजन-किर्तनाशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम होत नसल्याचे येथील महंतांनी सांगितले आहे. महंतांनी या विवाहाला त्यांच्याविरोधातील कटकारस्थान ठरवले आहे. साक्षी मिश्रा आणि अजितेश कुमार यांनी ज्या मंदिरात लग्न केले तेथील महंत परशुराम दास म्हणाले, मंदिरामध्ये अशाप्रकारचे कोणतेही लग्न झाले नाही. हे मंदिर माझे आहे. येथे कोणताही विवाह झाल्यानंतर प्रमाणपत्रावर आमचा शिक्का आणि फोटो असतो. ज्या पंडितने हा विवाह केला आहे तो खोटारडा आहे.
आम्हाला अजितेशच्या जातीवर काहीही विरोध नव्हता. परंतु, अजितेश साक्षीपेक्षा ९ वर्षांनी मोठा असल्याने आमचा विरोध होता. मला जास्त त्रास देण्यात आला तर आत्महत्या करेल, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश मिश्रा माध्यमांशी दिली. साक्षीने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राजेश मिश्रा म्हणाले होते, की माझी मुलीने स्वत:च्या मर्जीने विवाहाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही साक्षीच्या मागे कोणालाही लावले नाही किंवा त्यांना मारण्यासाठी गुंड पाठवले नाहीत. जनतेची सेवा करणे आमचे काम आहे. तेच आम्ही करत आहोत.
साक्षी पोस्ट केलेल्या व्हिडिओत राजीव राणाचे सारखे नाव घेते. राजीव राणा यांनी याप्रकरणी बोलताना म्हटले आहे, की मला या घटनेबद्दल काहीही माहिती नाही. ९ जुलैला व्हिडिओ बघितल्यानंतर याबद्दल मला माहिती झाले. माझ्याकडून त्यांना कोणताही धोका नाही किंवा त्यांच्या मागे मी कोणाला लावले नाही. हे सर्व खोटे असून माध्यमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.