चेन्नई - दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभनेता रजनीकांत याने चेन्नई महानगरपालिकने आकारलेला साडेसहा लाखांचा कर जमा केला आहे. महानगरपालिकने आकारलेल्या कराविरोधात रजनीकांतने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने त्याने तत्काळ कराची रक्कम भरली.
मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता सुमंत यांच्या पुढे याचिकेची सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी याचिका फेटाळून लावली. तसेच याचिका तत्काळ मागे घेण्यास सांगितले. न्यायालयाचा वेळ वाया घालवल्यामुळे दंड आकरण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.
काय आहे प्रकरण?
चेन्नईत अभिनेता रजनीकांत यांच्या मालकीचे राघवेंद्र मंडपम हे मंगल कार्यालय आहे. या कार्यालयाला चेन्नई महानगर पालिकेने साडेसहा लाखांचा कर आकारला होता. सहा महिन्यांचा कर कार्यालयाला आकारण्यात आला होता. मात्र, या विरोधात रजनीकांतने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर रजनीकांतने महानगपालिकेकडे कर जमा केला.
रजनीकांतची प्रतिक्रिया
मंगल कार्यालयाच्या करप्रकरणी उच्च न्यायालयाऐवजी महानगरपालिकेत तक्रार दाखल करायला हवी होती. आधी न्यायालयात जाण्याची चूक टाळता आली असती. मात्र, अनुभवाने शिकायला मिळाले,अशी प्रतिक्रिया रजनीकांतने दिली आहे. चेन्नई महानगरपालिकेने कर आकरल्यानंतर त्या विरोधात रजनीकांतने महानगरपालिकेकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर करात सुट मिळवी, यासाठी अर्ज केला होता. मात्र, लगेच उच्च न्यायालयातही धाव घेतली.