रायपूर - शेतीमध्ये विविध पिकांचे उत्पादन घेताना शेतकरी अनेक कीटकनाशकांची फवारणी पिकांवर करतात. ही कीटकनाशके दिवसेंदिवस मानवी आरोग्यासाठी हानीकारक बनत आहेत. त्यामुळे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या २७ कीटकनाशकांवर बंदी घालण्याचे ठरवले आहे.
धोकादायक कीटकनाशके -
मोनोक्रोटोफॉस : या कीटकनाशकाचा वापर भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात केला जातो. पक्षी, सस्तन प्राणी, मासे आणि झिंग्यासाठी हे कीटकनाशक धोकादायक आहे. मोनोक्रोटोफॉसमुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्याही घटना आहेत. ११२ देशांमध्ये या कीटकनाशकावर बंदी घालण्यात आलेली आहे.
क्विनॉलफॉस : या कीटकनाशकाचा वापर भारतात सर्रास केला जातो. याचा समावेश पिवळ्या दर्जाच्या म्हणजेच अतिशय विषारी कीटकनाशकांमध्ये केला गेला आहे. ३० देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.
ऑक्सिफ्लोरोफेन : दोन देशांनी या कीटकनाशकावर बंदी घातलेली असून आता भारतही घालणार आहे. तांदूळ, भुईमूग, कांदा, बटाटा या पिकांवर याचा वापर केला जातो.
बंदी घालण्यात येणारी कीटकनाशके - पेंडिमेथिलिन, सल्फोसल्फ्युरॉन, थायोडिकार्ब, थियोफेनेट मिथाईल, थिरम, मेथोमाईल, मेंकोजेब, मेलाथियोन, डि्यूरोन, डायमेथोयट, डिकॉफोल, डेल्टामेथ्रिन, क्लोरोपाईरिफॉस, कार्बोफ्युरॉन, कार्बेन्डाजिम, बटाचोर, बेनफुरैकार्ब, एट्रॉजीन आणि ऐसफेट
कीटकनाशकांमुळे आरोग्यावर होणारे परिणाम -
कीटकनाशकांमुळे अस्थमा, स्वमग्नता (ऑटिझम), डायबिटीज, पार्किन्सन, अल्झायमर, प्रजनन संस्था कमकुवत होणे, वेळे अगोदर प्रसूती होणे, मूत्रपिंडाचे आजार यां सारखे आजार होतात.
कीटकनाशकांचा ९० टक्के भाग मानव आणि इतर पशु-पक्षी ग्रहण करतात -
कृषी तज्ज्ञांच्या मते, कीटकनाशकांचा फक्त १० टक्के भाग कीटकांना मारण्यासाठी उपयोगात येतो. बाकीचा ९० टक्के भाग पिकामध्ये समाविष्ट होतो. त्यानंतर तो अन्नावाटे मानवी शरीरात जातो. याबाबत कृषी विद्यापीठे संशोधन करत असून यात कीटकनाशकांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत. धोकादायक कीटकनाशकांचे लाल आणि पिवळ्या गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. या कीटकनाशकांवर बंदी घालण्याची तयारी सरकार करत आहे, अशी माहिती इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील कृषी तज्ञ डॉ. गजेंद्र चंद्रकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
टप्प्या-टप्प्याने कीटकनाशकांवर आणावी बंदी -
कीटकनाशकांचा अतिवापर हा मानवी आरोग्यासाठी धोकादायकच आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कीटकनाशक विक्रेत्यांनी स्वागत केले आहे. मात्र, बाजारात सध्या उपलब्ध असलेला साठा विकण्याची परवानगी देण्यात यावी. म्हणजे उत्पादक आणि विक्रेत्यांचेही नुकसान होणार नाही, असे विक्रेत्यांचे म्हणने आहे.
कीटकनाशके निर्मितीत भारताचा चौथा क्रमांक -
विविध देशांमध्ये बंदी असलेली १००पेक्षा जास्त कीटकनाशके भारतात सध्या विकली आणि वापरली जात आहेत. जगभरात दरवर्षी २० लाख टन कीटकनाशकांचे उत्पादन होते यात भारताचा चौथा क्रमांक लागतो. आता कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २७ कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.