अहमदाबाद - गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आज(रविवार) सकाळी ३.६ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप हाती आली नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छमधील अंजार गावात
सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी जिल्ह्यातील विविध भागांत ३.६ रिश्टर स्केलचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छमधील अंजार गावापासून १२ किलोमीटर नैऋत्य भागात होता. तसेच जमिनीखाली सुमारे १९ किमी खोल भूकंपाची नाभी (फोकस) होती, असे गांधीनगरमधील इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजीने सांगितले.
कच्छ जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्रात
राज्य आपत्ती निवारण विभागानुसार गुजरातमधील कच्छ जिल्हा हा उच्च भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. जानेवारी २००१ साली कच्छ जिल्ह्यात विध्वंसक भूकंप झाला होता. यावर्षी १४ जून या दिवशी कच्छला ५.५ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता.