भोपाळ(इंदूर) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान देशाच्या अनेक भागात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. अशा कामगारांनी लॉकडाऊनला कंटाळून मिळेल त्या पद्धतीने घरचा रस्ता धरला आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमधील पोलिसांनी सिमेंट मिक्सरमध्ये बसून घरी जाणाऱ्या काही कामगारांना ताब्यात घेतले आहे.
वाहनांची नियमित तपासणी सुरू असताना पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. हे सर्व कामगार मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावी निघाले होते. पोलिसांनी या सर्व कामगारांना ताब्यात घेतले असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने काही अटींसह अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारांना परवानगी दिली आहे. त्यानुसार काही ठिकाणांवरुन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न राज्य सरकारं करत आहेत. मात्र, तरीही आता कामगार स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.