तिरुवनंतपुरम् - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान देशाच्या अनेक भागात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. केरळमध्येही उत्तर प्रदेशातील काही कामगार अडकून पडले आहेत. त्यांनी सायकलवर घरचा रस्ता धरला आहे.
जयेंदर सिंग, मोहन शर्मा, अजित सिंग आणि देवेंद्र सिंग, अशी या कामगारांची नावे आहेत. लॉकडाऊनमुळे हे केरळमधील चालक्कुडी येथे अडकून पडले होते. मागील २१ मार्चपासून त्यांना काम नाही त्यामुळे त्यांच्या राहण्या आणि खाण्याचे हाल होऊ लागले. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यांनी सायकलवर घरी जाण्याचा निर्णय घेतला. केरळपासून त्यांच्या घरांचे अंतर तब्बल २ हजार किमी आहे.
चालक्कुडीपासून काही अंतरावर गेल्यानंतर काही समाजसेवकांची नजर या चार कामगारांवर पडली. त्यांनी या चौघांच्या जेवणाची व्यवस्था केली. दरम्यान, हैदराबादमधील लिंगमपल्ली येथून १ हजार २०० कामगार घेऊन एक रेल्वे झारखंडला रवाना करण्यात आली. केंद्र शासनानेही कामगारांच्या प्रवासासाठी सशर्त मंजूरी दिली आहे.