मुजफ्फरनगर - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनेक स्थलांतरित कामगारांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. अशाच एका कामगार महिलेने प्रवासादरम्यान उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात मुलाला जन्म दिला आहे. ही महिला आपल्या पतीसोबत हिमाचल प्रदेशहून आपल्या मूळ गावी निघाली होती.
ट्रकमधून पतीसोबत प्रवास करत असताना बादून जिल्ह्यातील खातिमा पानिपत महामार्गावर रविवारी सायंकाळच्या सुमारास तिला प्रसूती कळा येऊ लागल्या. जनसथ प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अशोक कुमार यांनी सांगितले की, आरती यांना तातडीने केंद्रात दाखल करण्यात आले. यानंतर महिलेने मुलाला जन्म दिला.
मे महिन्याच्या सुरुवातीला एका सहा महिन्याच्या गरोदर महिलेने बसमध्येच जुळ्या मुलींना जन्म दिला होता. बरेली जिल्ह्याजवळ तिने बाळांना जन्म दिला. मात्र, एका तासातच बाळांचा मृत्यू झाला. याशिवाय श्रमिक ट्रेनने गुजरातहून वाराणसीत निघालेल्या एक महिलेनेही ट्रेनमध्येच जुळ्या मुलांना जन्म दिला होता. या बाळांचाही काही तासातच मृत्यू झाला होता.